कडेगाव पूर्व भागाच्या पतसंस्थेतील बोगस ठराव प्रकरण
खबऱ्या मात्र करणार सगळ्याचा भांडाफोड
कडेगाव:- आपल्या संस्थेच्या शाखाधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करीत संस्थेचे शिक्के वापरून बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे एका नागरिकाची स्थावर मालमत्ता गहाणखत करून घेतली हे प्रकरण संस्थेचे चेअरमन,मुख्य व्यवस्थापक आणि संचालक मंडळाच्या समोर येऊनही संचालक मंडळ संबंधित शाखाधिकाऱ्यावर मेहेरबान असल्याचं स्पष्ट होत आहे. संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांच्या मेहेरबानीचे नक्की कारण काय असावे आणि ए रिश्ता क्या केहलाता है असा सवाल उपस्थित केला जात असून संचालक मंडळ कितीही मेहेरबान असले तरी संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड मात्र गोपनीय खबऱ्या करणार आहे.
कडेगाव पूर्व भागातील एका नामवंत पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाने कर्ज मागणीसाठी आलेल्या एका नागरिकाची आर्थिक फसवणूक करीत संस्थेचे कर्ज मंजुरीचे बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे त्याची स्थावर जंगम मालमत्ता संस्थेच्या नावे गहाणखत करून घेतली असून याबदल्यात त्यास देऊ केलेलं कर्ज मात्र देण्यास टाळाटाळ करीत असल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता. कर्ज मंजूर करतो म्हणून या शाखा व्यवस्थापकाने संबंधित नागरिकाकडून भली मोठी रक्कम ही उकळली होती.
या प्रकरणात आता संबंधित शाखाधिकाऱ्याने बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे संबंधित नागरिकासच नव्हे तर संस्थेस ही फसवल्या चे स्पष्ट झालं असताना संस्थे मार्फत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे पहावयास मिळत आहे. संबंधित शाखाधिकाऱ्याने आजपर्यंत असे तीन ते चार किस्से केले असल्याचे संस्थेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. मग संबंधित शाखाधिकारी अजूनही संस्थेच्या कार्यालयात कामावर कसा काय हजर असतो? त्याच्यावर संस्थेमार्फत फसवणुकीचा गुन्हा आजपर्यंत का दाखल झाला नाही? प्रशासन किंवा पदाधिकारी यांच्या पैकी या शाखाधिकाऱ्याच्या पाठीशी कोण आहे? शाखाधिकाऱ्याने सर्वसामान्य लोकांकडून उकळलेल्या पैशातील काही भाग या पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीला तर जात नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

