कोल्हापूर : खबऱ्या प्रतिनिधी : बहुचर्चित रफिक पटेलवर अजून किती गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस प्रशासन मोक्का अंतर्गत कारवाई करणार, असा प्रश्न सर्वसामान्य वर्गातून दैनंदिन चर्चेत प्रामुख्याने प्रशासनास विचारला जात आहे.
ज्यांच्या रोजी रोटीचा मोठा प्रश्न उभा आहे, ज्यांच्या डोक्यावर भलं मोठं कर्ज आहे, ज्यांची गरजा भागविण्यासाठी धडपड सुरू आहे असे काहीजण म्हैसाळ येथील मृत्यूकांडात संशयित आरोपी म्हणून सावकारी कायद्याखाली अटक आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी भल्या मोठ्या व्याजाच्या रकमेपोटी सावकारी करणाऱ्या रफिक अहमद रसूल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हा त्यांना मात्र सही सलामत वाचवण्यात काहींना मोठं यश मिळालं, अशी चर्चा जाणकार मंडळीतून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा व्याजाच्या रकमेसाठी तगादा लावून पठाणी वसुली करणाऱ्या सावकार पटेल यांना अटक करण्यात आली होती .पुन्हा महिनाभरा पूर्वी याच सावकाराच्या बेलगाम भानगडींच्या फार्महाऊस वर छापा टाकून किरकोळ कारवाई केली असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.
मुलीला सोडचिठी देणाऱ्या जावयाला ४ वर्षांनी मारण्याची सुपारी देणाऱ्या पटेल यांच्यासहित ६ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सोमवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांत सुरू होते.
याप्रकरणी डॉ. वसीम महेबूब मुल्ला यांनी रफिक अहमद रसूल पटेल, अलमास पटेल, जहुर अहमद रफिक पटेल, अजमल पटेल (सर्व रा.मिरज), अभिनंदन खोत (सांगली), वसीम शेख व श्रीकांत पाटील (दोघेही इचलकरंजी) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात भा.द.वि.स कलम ३२४,११६,३२३,५०४,५०६, १२०(बी),४ ,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी श्रीकांत इंगवले हे करीत आहेत.

