मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी: पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिरजेतील मार्केट परिसरात होणार्या 100 बेडच्या नव्या शासकीय हॉस्पिटलसाठीचे 46 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलचे काम लवकरच सुरू होणार आहे.
मिरजेत शासनाचे सिव्हिल हॉस्पिटल आहे. तेथे सुमारे 300 हून अधिक बेडची व्यवस्था आहे. शिवाय महापालिकेचा मिरज मार्केटमध्ये दवाखाना आहे. मात्र, तेथे अपुरी वैद्यकीय सेवा मिळते. त्यामुळे त्याठिकाणी नव्याने 100 बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यासाठी ना. जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यांनी यापूर्वी भेट देवून पाहणी करून जागा निश्चित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने जागा निश्चित केली. या हॉस्पिटलसाठी सुमारे 46 कोटी रुपये मंजूर झाले होते. ते 46 कोटी रुपये आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये महिला व बाल शिशुंसाठी चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. निधी वर्ग झाल्याने आता या हॉस्पिटलचे काम लवकरच सुरू होणार आहे.