सांगली :गोपनीय खबऱ्या; सांगली शहरात लूटमार करणाऱ्या टोळीला सांगलीच्या विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन लुटमारीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी अटक केलेल्या तिघांकडून एक मोबाईल आणि दुचाकी असा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलिसांचे पथक सोमवारी गस्त घालत असताना हनुमान नगर येथे तिघे जण दुचाकीवरून संशयित रित्या फिरताना आढळून आले. पाेलीसांनी त्यांना थांबवले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक मोबाईल सापडला. त्यांना दुचाकीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
अखेर पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. दरम्यान या तिघांनी गेल्या आठवड्यात गणेश मार्केट जवळ सलून व्यावसायिक याला अडवून त्याच्याकडे मोबाईल आणि शंभर रुपये काढून घेतले होते. तसेच जुना बुधगाव रस्त्यावरील गणेश शिंदे यांना दगडाने मारहाण करून खिशातील मोबाईल चाेरला होता. हे दोन गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आले आहेत अशी माहिती विश्रामबाग पाेलीसांनी दिली.

