इचलकरंजी : कुस्तीचे आश्रयदाते राजर्षी छ्त्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त इचलकरंजी शहरामध्ये १५ वर्षाखालील फ्री स्टाइल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे.
जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेमध्ये ऑनलाइन पद्धतीने ५५० स्पर्धकांनी अर्ज केले आहेत. १६ मे रोजी सकाळी साडेअकरा स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अधिकाधिक कुस्ती शौकिनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पैलवान अमृत भोसले यांनी केले.
राज्यामधून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतल्याने तीन मॅटची व्यवस्था केली आहे. व्यंकोबा मैदान, जिम्नॅशियम मैदान, वेद भवन येथे या कुस्त्या होणार आहेत. सकाळी आठ वाजता स्पर्धकांच्या वजनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर व्यंकोबा मैदान येथे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. एकूण १० वजनीगटामध्ये स्पर्धा होणार असून ज्या पैलवानांचा प्रथक क्रमांक येईल त्यांची रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. उद्घाटन समारंभास माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पृथ्वीराज महाडीक, अशोक जांभळे, सतीश डाळ्या, मदन कारंडे, महावीर गाट, रवींद्र माने उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.

