खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीतील अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यातील ४० अन्न आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी २७ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. तीन हॉटेल आणि एका बेकरीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. स्वच्छतेचा अभाव, अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि बंदी असलेल्या पदार्थांचा वापर आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
‘अन्न आस्थापनांनी स्वच्छतेची काटेकोर काळजी घ्यावी; अन्यथा कठोर कारवाई टाळता येणार नाही,’ असा इशारा सहाय्यक आयुक्त नीलेश मसारे यांनी दिला. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न आस्थापनांवर कायद्याचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात यापूर्वीही या विभागाकडून कमी मनुष्यबळावर कारवाई होत होती. मात्र, आता आस्थापनांकडून स्वतःहून नियमांचे पालन करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक महिन्यांपासून स्वच्छता न झालेल्या काही हॉटेलांनी साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. बंदी असलेले अनेक पदार्थ किचनमधून हटविण्यात आले आहेत, तरीही अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यातील पाच दूध विक्री केंद्रे, २२ हॉटेल आणि १३ अन्य अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी त्रुटी आढळलेल्या २७ आस्थापनांना नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक सुधारणा न झाल्यास सुनावणी घेऊन संबंधितांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. आतापर्यंत पलूस तालुक्यातील तीन हॉटेलसह एकूण चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती श्री. मसारे यांनी दिली.
तर अन्न औषध प्रशासन विभागातील काही कर्मचारी आणि संशयित पद्धतीने गैरव्यवहार करणारे निरीक्षक हे हप्ते घेऊन आजपर्यंत भेसळ करणारे आणि गुटख्यासह प्रतिबंधित केलेली काही औषधे विक्री करणाऱ्या आस्थापनाना अभय देत असून गैर प्रकारे आर्थिक व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळत आहे.
तातडीने बदल करण्याचे प्रशासनाकडून आदेश..!
- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
- किचन, तसेच ग्राहक बसण्याच्या जागेची नियमित स्वच्छता राखावी.
- पिण्याचे व अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी स्वच्छ टाकीत साठवावे.
- पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल जतन करावा.
- अन्नपदार्थ तयार करताना कृत्रिम रंगांचा वापर टाळावा.
- कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
- किचन व डायनिंग हॉलमधील कचरापेट्या नेहमी झाकून ठेवाव्यात.
- हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये नियमित पेस्ट कंट्रोल करून घ्यावे.

