कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम उत्सव शांततेत भक्तीमय वातावरणात पार पडला. मोहरमाला रविवार पासून प्रारंभ झाला.शुक्रवारी सायंकाळी पंजाची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून बुधगाव रस्त्यालगत पंजाचे विसर्जन करण्यात आले.सालाबादप्रमाणे शहरातील हजरत लाडले मशायक दर्ग्यातील मोहरखाना , तराळ गल्ली, फकीरमाळा या ठिकाणी पंजे प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंगळवारी रात्री पंजाची पहिली भेट, गुरुवारी कत्तल रात्र, शुक्रवारी पहाटे पुन्हा भक्तीमय वातावरणात पंजाची भेट पार पडली.

मोहरम निमित्त सरबत वाटप करताना कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे (फोटो – प्रविण मिरजकर)
शुक्रवारी सायंकाळी चार वाजता हजरत लाडले मसाज दर्ग्यातून गावठाण मधील चावडी चौक , पाटीलवाडा, लिंगायत गल्ली, थोरला गणपती चौक, तराळ गल्ली, मुजावर गल्ली,जैन गल्ली, बसस्टॉप , सोसायटी चौक, मंगळावर बाजार मार्गे भक्तीमय वातावरणात ताशांच्या निनादात या हुसैन च्या जयघोषात पंजांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बालचमूपासून अबालवृद्धापर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.
मिरवणूक मार्गावर ठीक ठिकाणी बुंदी, सरबत, वाटप करण्यात आले. मिरवणूक मार्गावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



















