खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्यासाठी ‘गुंडा विरोधी पथक ‘ स्थापन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांचं वाढते प्रमाण पाहता पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दहशत माजवणे, खंडणी, खून , अवैध सावकारी याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून धाडसी निर्णय घेत जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी गुंडा विरोधी पथकाची स्थापना केली आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा वाढते प्रमाण, खून, मारामाऱ्या, खंडणी, दरोडे आणि शस्त्राचा धाक दाखवून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी पोलीस दलाकडून आता प्रभावी अंमलबजावणी केल्याचे दिसत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत गुंडा विरोधी पथकाची स्थापना केल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली.
या गुंडाविरोधी पथकामध्ये विशेष करून गुन्ह्यांच्या बाबतीत धाडस दाखवणारा खमक्या अधिकारी, आणि जवळपास ५ अंमलदार यांचा समावेश असणार आहे. नुकतेच शुक्रवारी दुपारी विश्रामबाग परिसरातील कॅफे सेंटरवर पोलिसांनी अचानक धाडसत्र सुरू करून कॅफे व त्या संबंधित असणाऱ्या बंद खोलीमध्ये चालणारे अश्लील चाळे मोडीत काढण्यासाठी पाऊल उचलत कठोर निर्णय घेतला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, सतत शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या आणि खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये समावेश असणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यासाठी गुंडाविरोधी पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सामान्य नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत असून लवकरच याबाबतीत गुंडाविरुद्ध पथकाची विशेष टीम आता रस्त्यावर उतरून धडक कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.



















