खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
कुपवाड औद्योगिक परिसरातील काननवाडी रोडवरील पटेल हळद मिलला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या तसेच औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या.
अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. आगीत मोठी वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही
घटनास्थळावरील प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत मिलमधील हळद व इतर मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, हमाल बांधव आणि कामगारांनी माल सुरक्षित स्थळी हलवून नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. नुकसानीचा नेमका आकडा आणि आगीचे निश्चित कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

