खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शाळकरी मुलगा वेदांत बंडगर यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांची गय केली जाणार नाही अथवा हस्तक्षेप व दबाव खपवून घेतला जाणार नाही. संशयित दोषीवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.पालकमंत्री पाटील म्हणाले, मुलाच्या हत्येची घटना गंभीर व दुर्देवी आहे.
या प्रकरणी पिडीतांना न्याय देण्यासाठी प्रत्येक दोषी व्यक्तीला कायद्यापुढे उभे करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या असून, पीडिताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश गडदे व त्याचा साथीदार अतुल वायदंडे यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादीत नमूद असलेल्या अन्य तीन आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला एकही आरोपी सुटणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. तपासातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) चे कलम लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकांचा प्राथमिक चौकशी अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीसांच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असून लहान मुलाचा खून करणार्यांना वाचविण्याचे प्रयत्न राजकीय यंत्रणेकडून होत असल्याचा आरोप खा. विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला? पोलीेस अधिकार्यांच्या संपर्कात कोण होते, कुणाचे फोन आले याची चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. खून झाला की अल्पवयीन मुलाने केला असल्याचे तपासात पुढे आणायचे, एक वर्षानंतर त्याला सुधारगृहातून बाहेर काढायचे असा फंडा पोलीस वापरत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

