खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
विश्रामबाग परिसरातील लिमये मळा येथे नशेखोरानी क्रांतिकुमार शेडबाळे यांचा खून केल्याच्या निषेधार्थ शहरातील आणि धामणीमधील नागरिकांनी पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी काही निवडक नागरिकांना सोडण्यात येत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातच गोंधळ घातला. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी संतप्त नागरिकांची भेट घेऊन नशेखोर हल्लेखोरांवर व नशेखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
दरम्यान, क्रांतिकुमार शेडबाळे यांच्या खून प्रकरणातील संशयितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व लिमये मळा परिसरात नशा करण्यासाठी येणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी, या मागणीसाठी लिमये मळा व धामणी परिसरातील नागरिक विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोर आले होते. परंतु पोलिसांकडून ओळखपरेड झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोर तासभर ठिय्या मारून आंदोलन केले. त्यानंतर नशेखोरीविरोधात निवेदन देण्यासाठी पोलिस अधीक्षक यांना भेटण्यासाठी सर्व नागरिक पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. यावेळी काही मोजक्याच नागरिकांना पोलिस अधीक्षकांची भेट घेता येईल, असे सांगितल्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला.
पोलिस अधीक्षक कार्यालयात सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी संतप्त नागरिकांची भेट घेतली. यानंतर नागरिकांनी नशेखोरांविरोधात जणू पाढाच वाचला. क्रांतिकुमार शेडबाळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या नशेखोरांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. तसेच लिमये मळा परिसर आणि धामणी परिसरामध्ये दररोज नशा करण्यासाठी काही तरुण येत आहेत, रात्रीच्यावेळी शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा नशेखोर तरुणांवर कारवाई करावी, तसेच या ठिकाणी पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.
यावर सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला. परंतु पोलिस अधीक्षक कार्यालयात सुमारे तासभर सुरू असणाऱ्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला होता. या आंदोलनामध्ये विश्रामबाग परिसरातील लिमये मळा आणि धामणीमधील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांकडून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन देण्यात आले.

