- जिल्हा परिषदेच्या प्रचारात आमदार-खासदार आमनेसामने, प्रतिष्ठा पणाला.!
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज तालुक्याच्या राजकारणात एरव्ही एकमेकांना सांभाळूनच बोलणारे आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्यात या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच आक्रमक भाषेत हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत.त्यामुळे मिरज पूर्व भागात राजकीय वातावरण तापले आहे.
आमदार खाडे यांनी आपल्या सर्व समर्थकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते कुटुंबीयांसह प्रचारासाठी ताकदीने मैदानात उतरले आहेत. गेल्या १६-१७ वर्षांत त्यांनी मतदारसंघासाठी आणलेल्या विकास निधीबाबत ते आठवण करून देत आहेत.
‘यापुढेही निधी हवा असेल तर भाजपलाच विजयी करा,’ असे आवाहन करताना ते आक्रमक भाषा वापरत आहेत. त्याचवेळी ‘विरोधी काँग्रेस आघाडीकडे ना सत्ता आहे, ना नेता आहे,’ अशा शब्दांत ते टीका करीत आहेत.
वसंतदादा गटाचे मिरज पूर्व भागात परंपरागत वर्चस्व राहिले आहे. बाजार समिती, जिल्हा बँकेसह विविध सत्ताकेंद्रांत दादा गटाने मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांना कायम संधी दिली आहे. मदन पाटील यांनीही या भागात कायम वर्चस्व ठेवले.
मात्र आता त्यांच्या मागे जयश्री पाटील भाजपवासी झाल्या. दादा गटाचे कार्यकर्ते बाजूला पडले होते. विशाल पाटील यांनी गटाची धुरा व्यक्तिशः हाती घेत उमेदवार निवडीपासून लक्ष
घातले आहे.
आमदार खाडे यांच्या निधीच्या आव्हानाला उत्तर देताना खासदार विशाल पाटील म्हणाले, ”वसंतदादांनी चारवेळा राज्याचे नेतृत्व केले, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशाचा पंतप्रधान कोण व्हावा, हे त्यांनी सुचवले, मात्र कधी अरेरावीची भाषा वापरली नाही.
मात्र नशिबाने आमदार झालेले लोकप्रतिनिधी बंदची भाषा करीत असल्याचा प्रतिहल्ला करीत आहेत. जिल्हा परिषदेत भाजपला दोन अंकी संख्या गाठू देणार नाही.”

