खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिका निवडणुकीचे निकाल लागताच आता झेडपी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना कुठे चांदीच्या वाट्या, कुठे वॉशिंग मशीन तर काही ठिकाणी ९ ते १० हजारांनी एकेक मत विकत घेतल्याचा प्रकार दिसून आला. आता झेडपी निवडणुकीत मतदारांना पुन्हा साड्या वाटून आमिष दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द परिसरात भरारी पथकाने संशयास्पद टेम्पो अडवत तपासणी केली. या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर साड्यांच्या पिशव्या आढळून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील महिला मतदारांना या साड्या वाटप केल्या जाणार होत्या. विशेष म्हणजे या साड्यांच्या पिशव्यांमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही साड्यांची वाटप प्रक्रिया निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
भरारी पथकाने सुमारे सात ते दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीदरम्यान आमिषाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

