खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
माणसाला माणसासारखी वागणूक द्या. सर्व समान आहेत. पहिले परमात्मा कोण आहे ? हे जाणून घ्या. परमात्मा प्रत्येकात आहे. सर्व अहंकार सोडून मानवसेवेत स्वतःला अर्पण करा.
एकमेकांविषयी प्रेम निर्माण होते. याच प्रेमातून आपण धरतीला स्वर्ग बनवू या, असा संदेश संत निरंकारी सत्संगाच्या सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांनी येथे दिला. २४ जानेवारी या दिवशी येथील सांगलीवाडीतील साडेतीन एकरांवर ५९ व्या निरंकारी संत सत्संगाला लाखो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ झाला. त्या वेळी सत्संगात त्यांनी मार्गदर्शन केले.
३ लाख चौरस फुटांच्या भव्य सभामंडपाच्या पूर्व बाजूने दुपारी शोभा यात्रेला प्रारंभ झाला. सजवलेल्या पांढर्याशुभ्र वाहनाला रथाचे स्वरूप देण्यात आले होते. वाहनाला जरबेरा फुलांच्या गुच्छांनी सजवले होते. सद्गुरु माता सुदीक्षा आणि निरंकारी रमित महाराज विराजमान झाले होते. त्यांना पहाण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. एवढी गर्दी असतांनाही कुठेही गोंधळ नव्हता. भाविकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन याद्वारे घडवले. शोभायात्रेत विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीचा संगम शोभायात्रेत पहाण्यास मिळाला. मुख्य प्रवेशद्वारावर सद्गुरूंचे रथातून आगमन झाले, तेव्हा पुष्पवृष्टी करण्यात आली.
‘बोलो प्यार से धन निरंकार’, असा जयघोष करत सहस्रो भाविक येत होते. प्रत्येक सेवेकरी ‘महात्मा’ म्हणून हात जोडून पुढील मार्ग दाखवत होते. तन, मन, धनाने सेवादलाचे सहस्रों स्वयंसेवक निःस्वार्थपणे सेवा करत होते. मुख्य मंडपात जमलेल्या सहस्रों भाविकांनी ‘धन निरंकर’ असा जयघोष केला. त्यानंतर भक्तीगीत, आध्यात्मिक प्रवचनात सर्वजण रमून गेले होते. निरंकारी संत सत्संगाच्या समितीचे अध्यक्ष श्री. शंभूनाथ तिवारी यांनी सद्गुरु माताजी, तसेच सत्संग समितीचे समन्वयक श्री. नंदकुमार झांबरे यांनी निरंकारी राजपिता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांनी मानवतेचा संदेश देत उपकृत केले.

