खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राज्यात महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. सध्या राज्यातील महापालिकांच्या महापौर पदासाठी महायुतीत खलबत्त होताना दिसत असून महाविकास आघाडीतील तिनही पक्षांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून ZP च्या तोंडावर भाजपने जोरका धक्का दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी रविवारी (ता.२५) जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. महेश खराडेंच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.
तालुका दुष्काळमुक्त व्हावा. तालुक्यात पाणी योजना यावेत यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडून स्वाभिमानीत प्रवेश केला होता. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ऊस दर आंदोलन, शक्तिपीठ महामार्ग, शेतकर्याची अडकलेली ऊस बिले, दुष्काळ छावणी सुरू कराव्या असे अनेक आंदोलन केली आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. पण अचानक ते आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांना राजकीय धक्का बसला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी महेश खराडे यांनी आमदार रोहित पाटील यांना पाठिंबा दिला होता. ज्यामुळे संजयकाका यांच्याविरोधात रोहित पाटील यांना ताकद निर्माण झाली होती. तर त्यांच्या पाठिंब्यानंतर महेश खराडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. पण रोहित पाटील यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आज आपल्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आ. गोपीचंद पडळकर यांनी महेश खराडे यांच्या प्रवेशाचा मार्ग सूकर केल्याच्याही सध्या चर्चा सुरू असून आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष संग्राम महाडिक , तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

