खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
राज्यातील सर्वच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांच्या लढाईची चुरस पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एकमेकांविरोधातील आरोपांचे राजकीय फटाके फुटताना दिसत आहे. पुण्यातही निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. याच निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यातील माळेगावातही नगरपंचायतीच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरु आहे. या नगरपंचायतीमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि उमेदवाराला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. नितीन तावरे असे मारहाण झालेल्या उमेदवाराचे नाव आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष आणि उमेदवार नितीन तावरे यांना बेदम मारहाण झाली आहे.तावरे यांना मारहाण का झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारहाणीनंतर तावरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. तावरे यांना केलेल्या मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राजकाकीय कारणातून ही मारहाण झाली असल्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.

