मुंबई : शिवसेनेने आपल्या १४ मे ला मुंबईतील बीकेसी मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी केली असून सभेसाठी लोकांना आवाहन करण्यासाठी दोन टीझर रीलीज केले आहेत.
दरम्यान भाजपाने एक व्यंगचित्र ट्वीट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
परवा (ता.१४) शिवसेनेची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. हिंदुत्वाचा खरा आवाज ऐकायला यावं लागतंय असं अवाहन करत त्यांनी दोन टीझर रीलीज केले आहेत. त्यावर टोला लावत भाजपाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्यंगचित्र ट्वीट करण्यात आलं आहे. त्यामध्ये शिवसेना ही राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या मतानुसार चालते असं प्रतिकात्मक भाजपने दाखवलंय.
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे… pic.twitter.com/2nwkessBdG
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) May 12, 2022
भाजपाच्या ट्वीटरवरून शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमधील व्यंगचित्रात शरद पवार बसलेल दाखवले आहेत आणि त्यांच्या खुर्चीजवळ उद्धव ठाकरे वाकून उभे आहेत. आणि शरद पवार म्हणतायेत की, “उध्दवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर.” आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी होय म्हणत उत्तर दिलं आहे. असं ट्वीट भाजपाने केलं आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या झालेल्या तीन सभेनंतर महाराष्ट्रात सध्या भोंग्यावरून राजकारण पेटलं आहे. मनसेने मशिदीवरून भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ते आता आयोध्या दौरा करणार आहेत. ५ जूनला ते आयोध्येला जाणार आहेत. तर १४ मे ला शिवसेनेची सभा झाल्यावर आदित्य ठाकरे हे १० जून रोजी आयोध्येचा दौरा करणार आहेत.

