
खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शहरातील विजापूर वेस येथे असणार्या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन गट भिडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. दोन्ही गट तीनवेळा आमने-सामने आल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी दोन्ही जमावांना पिटाळून लावले. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील विजापूर वेस येथे असणार्या एका बारमध्ये विश्वेश घोडके (रा. नदीवेस, मिरज) व त्याचा मित्र प्रणव (पूर्ण नाव समजले नाही), तर जुल्लू बेपारी व समीर मुल्ला (रा. गुरुवार पेठ, मिरज) हे दोघे गेले होते. यावेळी विश्वेशने बारमधील काऊंटरवर जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर विश्वेशने बारची तोडफोड करण्यास सुरुवात केली. बारमधील काचा फोडून ग्लास फेकण्यास सुरुवात केली.
यावेळी बारमध्ये असणार्या जुल्लू व त्याचा मित्र समीर यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर विश्वेशने जुल्लू व समीर या दोघांना, तुम्ही कोण मला अडविणारे? असे म्हणून मारहाण केली. त्यानंतर जुल्लूने त्याच्या समर्थकांना बोलावून घेतले. बारमधून बाहेर पडल्यानंतर विजापूर वेस येथे असणार्या भाजी मंडईजवळ जुल्लू आणि समीर यांच्या समर्थकांनी विश्वेश आणि त्याचा मित्र प्रणव यांना मारहाण केली. त्यानंतर विश्वेश याचे समर्थकदेखील त्या ठिकाणी पोहोचल्याने दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच विश्वेशने घटनास्थळावरून धूम ठोकली. प्रणव याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

यानंतर पोलिस ठाण्यासमोर बेपारी आणि मुल्ला समर्थकांनी मोठी गर्दी केली. प्रणवला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने विश्वेश याचे काही समर्थक पोलिस ठाण्याजवळ पोहोचले. त्यावेळी पुन्हा दोन्ही गट एकमेकांना भिडले. यावेळी विश्वेश याच्या एका साथीदाराला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांना पिटाळून लावले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
विश्वेश याच्यावर गंभीर गुन्हे
विश्वेश याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्याविरुद्ध सावकारीतून मारहाण, गणेश विसर्जन मिरवणुकीत मारहाण, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. बारमधील हाणामारीनंतर विश्वेश याने पलायन केले.

