- सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
येथील वानलेसवाडी परिसरात पूर्वीच्या भांडणातून युवकाचा पाठलाग करून त्याच्यावर कुर्हाड, कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.
यश प्रवीण सावळकर (वय 17, हायस्कूल रोड, वानलेसवाडी, सांगली) असे जखमी युवकाचे नाव आहे.
यश याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तीन तासात संशयित तिघांना ताब्यात घेतले. खुनी हल्ल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मेघनाथ सोनभोईर, शुभम पारसे व संदेश अपराज अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत, तर राहुल भगत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सर्वजण तरुण आहेत आणि वानलेसवाडी परिसरात राहणारे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यश हा पेंटिंगचे काम करतो. तो वानलेसवाडी परिसरात आबा पाटील यांच्या घरी भाड्याने राहतो. तो व संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपूर्वी संशयित मेघनाथ व त्याचे साथीदार वानलेसवाडीत वेगाने दुचाकी चालवत जात होते. यावेळी यश याने त्याला अडवून ‘मोटरसायकल सावकाश चालवत जा’, अशी समज दिली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी संशयित शुभम याने ‘तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी दिली होती. या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी रात्री एकच्या सुमारास संशयित तिघांनी यशला घराबाहेर बोलाविले व त्याचा पाठलाग करीत त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढविला. हल्ल्यानंतरही पळ काढल्याने यश वाचला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले होते. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी तीन तासात मेघराज सोनभोईर, शुभम पारसे, संदेश अपराज या तिघांना ताब्यात घेतले. उपअधीक्षक विमला एम. यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
वानलेसवाडी बनतेय गुन्हेगारांचे केंद्र
वानलेसवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांत खुनीहल्ला, जबरी चोरी, मारामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या परिसरात नशेखोर तरुणांचा वावरही अधिक आहे. या नशेखोरांकडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे. वानलेसवाडीचा भाग गुन्हेगारांचे नवे केंद्र बनत चालले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून या परिसरातील गुन्हेगारांना पायबंद घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

