मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजणारी घाटात आराम बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात बस चालक किरकोळ जखमी झाला असून अन्य प्रवासी सुखरूप आहेत.सध्या अंजणारी घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मुंबईहून ग्लोबल ट्रॅव्हल्स ही खासगी बस २५ प्रवाशांना घेऊन गोव्याकडे जात असताना आंजणारी घाटीत या लक्झरी बसचे ब्रेक निकामी झाल्याने भांबावलेल्या चालकाने गाडी कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडावर जाऊन बस आदळल्याने रस्त्यातच ही बस पलटी झाली.
महामार्गावरून जाणाऱ्या अन्य प्रवाशांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात दुसरा चालक किरकोळ जखमी झाला.

