मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या साखळीतील एक कडी असलेल्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी मिरज तालुक्यातून अटक केली.
त्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात ड्रग्ज व्यापाराचे जाळे विणले गेले आहे का, याची चौकशी सुरू आहे. मिरजेत तंबाखूइतका सहज गांजा मिळतो, असे म्हटले जाते. आता ड्रग्जने इथे पाय पसरायला सुरवात केली आहे का, हा प्रश्न गंभीर आहे.
पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यात अनेक राजकीय नेत्यांची नावेही समोर आली. एकमेकांवर आरोप केले गेले. त्यातून वादळ उठले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या रॅकेटच्या माध्यमातून ड्रग्जनिर्मिती आणि विक्रीची व्यवस्था उभारण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यात सांगली जिल्ह्यातील एका तरुणाचा समावेश असल्याचे समोर आले.

