राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलनाची स्टंटबाजी : आंदोलन करणाऱ्या विज्ञान माने यांना फटकारले
सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलनाची स्टंटबाजी केली जात आहे. पालकमंत्री फार श्रीमंत पण नाही आणि भिकारी सुद्धा नाही. भिकाऱ्यांची भीक आम्ही घेत नसतो, अशा शब्दात पालकमंत्री सुरेश खाडे यांनी आंदोलन करणाऱ्या विज्ञान माने यांना फटकारल आहे.
कामगारांना नियमाच्या पेक्षा जास्त मोबदला कंपनीमार्फत देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार कंपनीने कामगारांना मोबदला सुद्धा दिलेला आहे, उर्वरित कामगारांना सुद्धा मोबदला दिला जाणार आहे, शिवाय सध्या कामाला असलेल्या कामगारांना नवीन कंपनीत सामावून घेण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलं आहे. कामगारांचे बायोडाटा जमा करून नवीन कंपनी त्यानुसार आवश्यक कामगारांना सेवेत सामावून घेणार आहे. मात्र कामगार हे कोर्टात गेले असून कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
मात्र कामगारांची दिशाभूल करून राजकीय नेत्यांच्याकडून आंदोलनाची स्टंटबाजी केली जात आहे असा आरोप पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केला आहे. पालकमंत्र्यांच्या फोटोचा वापर करून वादग्रस्त आशयाचा मजकूर असलेले प्रसिद्धीपत्रक काढणं हे योग्य नाही. लोकशाही मध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र नियमावली धरून आंदोलन केली जावीत. असेही पालकमंत्री खाडे म्हणाले.

