सांगली : ‘ऑन ड्युटी चोवीस तास’ असणाऱ्या पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन पाहायला मिळले. सांगली वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कुटुंबीयांपासून दुरावलेल्या वृद्धाला अखेर स्वतःचे घर मिळाले.
त्यामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ वर्षीय वृद्ध देवदर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. ते कुटुंबीयांपासून दुरावले. पंढरपूरच्या बंदोबस्तात असणारे सांगली वाहतूक पोलिस शहाजी जाधव व नीलेश पाटील यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. आपण घरापासून चुकल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने माहिती घेण्यास सुरवात केली. पंढरपुरात येणाऱ्या कोल्हापुरातील भाविकांकडे चौकशी केली असता थोडीफार माहिती मिळाली. मात्र त्या आजोबांना ते नेमक्या कोणत्या गावात राहतात, हेच सांगता येत नव्हते. आपल्या परिवारासमवेत आपण देवाला आलो आणि त्यांच्यापासून चुकलो, एवढेच ते सांगत होते. त्यांची अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना आसरा दिला. त्यानंतर पोलिसांनी कोल्हापूरमध्ये मोबाईलवरून संपर्क साधण्यास सुरवात केली, त्या वेळी गडहिंग्लज येथे एक आजोबा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
त्यांच्याशी तातडीने हवालदार शहाजी जाधव, नीलेश पाटील यांनी संपर्क साधला. ते आजोबा सुखरूप असल्याची माहिती दिली. तत्काळ आजोबाचे कुटुंबीय गाडी घेऊन पंढरपुरात आले. अखेर रात्री उशिरा घरापासून दुरावलेल्या आजोबांना पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. यावेळी कुटुंबीयांनी सर्वांचे आभार मानले.

