Yerawada Jail Latest News : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गुंड कधी पळाला, याचे उत्तर कारागृह प्रशासनाकडे नाहीये.
सोमवारी दुपारी कारागृह अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
आशिष जाधव, असं कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचं नाव आहे. पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी जाधव याला अटक केली होती.
तेव्हापासून तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. आरोपी जाधवची तुरुंगातील वागणूक पाहता, त्याला येरवडा कारागृह प्रशासनाने रेशन विभागात काम करण्यासाठी नियुक्त केलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
येरवडा तुरुंगात कडक पहारा असताना देखील आरोपी पळून कसा गेला? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.

