गोपनीय खबऱ्याच्या वृत्तानंतर घेतला निर्णय
कडेगाव :- सध्या कडेगाव आणि पलूस तालुक्यात गाजत असलेल्या तलाठयांच्या दुबार नोंदी प्रकरणात अनोखे आंदोलन फेम, पाणी संघर्ष चळवळीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी एस देशमुख यांनी उडी मारली आहे. देशमुख यांनी गोपनीय खबऱ्या कडून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सर्व माहिती घेत आपण कडेगावचे धडाकेबाज प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांना भेटून सर्व प्रकरण कानावर घालणार असल्याचे व दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे खबऱ्याला सांगितले.

कडेगाव आणि पलूस तालुक्यात काही भ्रष्ट मंडळींनी आर्थिक स्वार्थासाठी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरण्याचा धडाका लावला आहे. याबाबत दोन दिवसांपासून खबऱ्या सडेतोड वृत्तांकन करीत आहे. संबंधित वृत्तांची दखल घेऊन पाणी संघर्ष चळवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस कडेगावचे नेते तसेच अनोखे आंदोलन फेम डी एस देशमुख यांनी यात लक्ष घालून दोन्ही तालुक्यातील सगळ्या तलाठयांची निस्पक्ष तपासणी करण्याची मागणी प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांचेकडे करणार असल्याचे खबऱ्याला सांगितले.
खबऱ्याशी बोलताना देशमुख म्हणाले, कडेगाव आणि पलूस तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागातील काही भ्रष्ट लोकांमुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध वाळू उपसा असेल, तक्रार केसेस असतील आणि आता हे दुबार नोंदी प्रकरण. अशा प्रकारणांमधून फक्त सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून आर्थिक दृष्ट्या पिळण्याचे काम सुरु आहे आणि हे कदापि सहन केल जाणार नाही. हाती आलेल्या माहिती नुसार पलूस तालुक्यातील एका तलाठयाने तर दुबार नोंदीची पन्नाशी पार केली आहे. यात तक्रारी सुद्धा झाल्याचे समजले. तर कडेगाव तालुक्यात ही दहा पंधरा वर्षपूर्वीच्या रद्द नोंदी पुन्हा धरून कायद्याला आणि नियमांना तिलांजली देऊन भ्रष्ट कारभार काही लोकांनी चालवला आहे.याबाबतीत संपूर्ण माहिती घेऊन कडेगावचे प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांना भेटून उपलब्ध असलेली माहिती त्यांना देऊन तसेच संपूर्ण तपासणी करण्याची मागणी करणार आहे. यातून दोषी असणाऱ्या लोकांवर कठोर करवाई करावी अशी मागणी करणार आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल.

