सांगली प्रतिनिधी / कुपवाड परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या विश्वनाथ संजय खांडेकर (वय 22 रा. गंगानगर रोड वारणाली) रतन बनसोडे (वय 27 रा. आलिशान कॉलनी, कुपवाड ) गणेश मल्लाप्पा कोळी (वय २१ रा. झेडपी कॉलनी वारणाली) संतोष सुरेश पाडगे (वय 19 रा. महावीर नगर, विश्रामबाग) या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा मारून अटक केली. लॅपटॉप, मोबाईल, दुचाकी असा 2 लाख 80 हजारचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराव तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कारभार) यांनी टाटा आयपीएल क्रिकेट सामन्यावर बॅटिंग घेणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व अंमलदाराचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
बेटिंग घेणाऱ्यांचा शोध
बुकी विश्वनाथ खांडेकर याच्याकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये बेटिंग खेळणाऱ्या 23 जणांची नावे व मोबाईल नंबरची यादी मिळाली आहे. यादीतील संशयितांचा शोध सुरू आहे. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्यांची माहिती घेताना पथकातील दीपक गायकवाड, प्रशांत माळी यांना संशयित विश्वनाथ संजय खांडेकर हा कुपवाड ते वाघमोडेनगर जाणारे रस्त्यावर कृष्णा मोरे यांच्या मालकीचे शेतात शेडमध्ये लखनऊ सुपर व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल द्वारे धावांवर व विजय पराजय यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने कृष्णा मोरे यांच्या शेतात शेडमध्ये पंचासमक्ष छापा मारला. तसेच संशयित लॅपटॉप, मोबाईलच्या साह्याने क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत होते. चौघांना ताब्यात घेतल्यावर विश्वनाथ खांडेकर याने क्रिकेट लाईव्ह गुरु नावाच्या ॲपवर आयपीएलच्या सामन्याचा स्कोर व हार जीतचा भाव पाहत लोकांकडून पैसे घेत असल्याचे सांगितले. क्रिकेट सामन्याच्या हार जीत वर भाव असेल त्याप्रमाणे वाढीव भावाने पैसे देत असल्याचे कबूल केले. लॅपटॉप, मोबाईल, चार दुचाकी असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार दीपक गायकवाड, प्रशांत माळी, संदीप पाटील, सुनील चौधरी, सुधीर गोरे, अमोल आयदळे, राहुल जाधव, गौतम कांबळे अजय बेंद्रे, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने कारवाई केली.

