खुनाचा प्रयत्न केल्याचा राग मनात धरून संशयितांनी वैभववर हत्यारांच्या सहाय्यानं हल्ला केलाय.
कोरेगाव (सातारा) : जळगाव (ता.कोरेगाव) येथे एकाचा खून झाल्याची घटना काल (गुरूवार) रात्री घडलीय. वैभव विकास ढाणे (वय २८ वर्षे, रा. जळगाव, ता. कोरेगाव) असं मृताचं नाव आहे. या प्रकरणात जळगाव (Jalgaon) येथीलच एकासह पाच जणांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तलवार व कोयत्याचे वार झाल्याने वैभव गंभीर जखमी झाला. गेल्या वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या गुन्ह्याचा राग मनात धरून संशयितांनी काल (गुरूवार) रात्री पावणेबाराच्या सुमारास जळगावमधील भैरोबा मंदिरासमोर वैभववर हत्यारांच्या सहाय्यानं हल्ला केला. त्यात वैभव गंभीर जखमी झाला.
दरम्यान, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी (Koregaon Police) संशयावरून तिघांना ताब्यात घेतलं असून, काही जण फरार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडं पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, फरार झालेल्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
