सांगली : खबऱ्या प्रतिनिधी /अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या सह तिचा सांभाळ
करणाऱ्याकडे खंडणीची मागणी करणारा पोलिस हवालदार स्वप्नील कोळी याला निलंबित करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी दिले आहेत.
हवालदार कोळी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. त्याने जानेवारी 2022 मध्ये दसरा चौक परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.शिवाय रेड लाईट एरियात रहायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल असे म्हणून तिच्याकडून खंडणी घेतली. शिवाय तिचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तिकडूनही खंडणी घेतली होती.
याप्रकरणी एका सेवाभावी संस्थेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर चौकशी केल्यानंतर कोळी याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, खंडणी आदी कलमा नुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने त्याला मध्यरात्री अटक केली.
सध्या तो पोलीस कोठडीत असून सांगली शहरचे उपअधीक्षक अजित टिके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

