इचलकरंजी :खबऱ्या प्रतिनिधी/ रुग्णालयातून बाहेर पडणारे सांडपाणी विनाप्रक्रिया भुयारी गटारमार्गे पंचगंगेत मिसळत असल्याच्या तक्रारीवरून आयजीएम रुग्णालयास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहरातील आयजीएम रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत नाही. त्यामुळे घातक बायोमेडिकल वेस्ट सांडपाणी भुयारी गटारमार्गे पंचगंगा नदीत मिसळत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याची तक्रार आपले सरकार पोर्टलवर केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (उपप्रादेशिक कार्यालय, कोल्हापूर) क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी १८ जानेवारीला आयजीएम रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली होती. या वेळी अधिकाऱ्यांना काही त्रुटी आढळल्याने रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

