मिरज : खबऱ्या प्रतिनिधी / किरकोळ वादातून शहरातील जवाहर चौकाजवळील गोठण गल्ली परिसरामध्ये दोन गटात वाद होऊन दगडफेक करण्यात आली. प्रसंगी पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला.
लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर झाल्याची खात्रीशीर माहिती समजते आहे. दोन्ही गटाचे मिळून जवळपास १००-१५० कार्यकर्ते जमले होते .दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी – कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.
किरकोळ वाद सुरू असताना यावेळी दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक वाद झाले. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले असल्याचे वृत्त समजते आहे. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते पांगापांग झाले.यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सिंघम स्टाईलने आक्रमक भूमिका घेत जमावाच्या मध्ये घुसून थेट चोप देण्यासाठी लाठी चार्ज केला.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांनी हाणामारी व दगडफेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मात्र भल्याभल्यांचे धाबे दणाणल्याचे समजते आहे. वाद करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पळ काढत लपण्यासाठी आडोसा पकडला आहे. परंतु पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवल्याचे दिसले. जमावातील काही कार्यकर्त्यांची धरपकड करत असताना जवळपास १५ ते २० मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक समजते आहे.

