खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ रॉकफॉल प्रतिबंधात्मक कामांसाठी गुरुवारी (१८ जून) दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर राॅकफाॅल प्रतिबंधात्मक कामे हाती घेतली आहेत. या कामाअंतर्गत आडोशी बोगद्याजवळ महामार्गावरील किमी ४१/१०० येथे जाळींमध्ये अडकलेले दगड काढण्याचे काम गुरूवारी, १८ जुन रोजी दुपारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत द्रुतगती मार्गावरून बोरघाट मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जड तसेच अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.बोरघाट मार्गे मुंबई वाहिनीवरील कि.मी. क्र.५९/००पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वाहतूक वरील कालावधीमध्ये पूर्णत: बंद राहील. तर बोरघाट मार्गे पुणे वाहिनीवरील कि.मी. क्र. ३०/००० पासून सर्व जड-अवजड वाहनासांठी वरील कालावधीमध्ये वाहतूक पूर्णत: बंद राहील. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने व बसेस / प्रवासी वाहनांची वाहतूक कि.मी. क्र.५९/००० पासून कनेकटींग लिंक मार्गे मुंबईकडे सुरू राहणार आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणारी हलकी मोटार वाहने, बस, प्रवासी वाहनांची वाहतूक कि.मी. क्र ३९/०० येथून मिसिंग लिंक मार्गे पुणेकडे सुरू राहणार आहे. लोणावळा व खंडाळा येथून मुंबईकडे जाणारी हलकी मोटार वाहने आणि बस, प्रवासी वाहने, तसेच जड-अवजड वाहने द्रुतगतीवरील कि.मी. क्र. ४५/०० येथे थांबविण्यात येतील.
वाहनचालकांनी वरीलप्रमाणे प्रवासाचे नियोजन करावे तसेच वरील कालावधीदरम्यान अडचण आल्यास मदतीसाठी द्रुतगती मार्गाच्या नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ आणि महामार्ग पोलीस विभागाचा दूरध्वनी क्रमांक ९८३३४९८३३४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.

