खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रस्त्याचे काम सुरू असल्याने भीषण अपघात झाला. दुचाकी घसरून ट्रकखाली सापडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. या अपघातात एका महिलेच्या दोन्ही पायावरून ट्रक गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
हा अपघात सोमवारी दुपारी घडला. रेवती फराटे (वय ४३, रा. विजयनगर) आणि धनश्री शेंडगे (वय ३२, रा. बामणोली) अशी जखमी महिलांची नावे आहेत.
कुपवाड रोडवरील बामणोली आणि विजयनगर परिसरात राहणाऱ्या रेवती फराटे आणि धनश्री शेंडगे या दोन महिला दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीएम ७५०९) निघाल्या होत्या. त्या लक्ष्मी मंदिर चौकात आल्या. त्यावेळी रस्त्याचे काम सुरू असल्याने या महिलांची दुचाकी घसरली. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या खाली त्यांची दुचाकी गेली. या अपघातात एका महिलेच्या दोन्ही पायावरून ट्रक गेला, तर एक महिला बाजूला फेकली गेल्याने जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही महिलांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती.

