खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
म्हैसाळ पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार कविता गणेश निकम यांचे पती गणेश अशोक निकम (वय ४६) यांचे आकस्मिक निधन झाले.गणेश निकम हे गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते.
त्यांच्या दीर्घकालीन पक्षकार्याची दखल घेत पक्षाने मिरज पंचायत समिती अंतर्गत म्हैसाळ गणासाठी अधिकृत उमेदवारी दिली होती. त्यांनी प्रचाराचे सुसूत्र नियोजन करून जोमाने प्रचार सुरू केला होता. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
रविवारी (ता. १) त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मिरज येथील युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या आकस्मिक निधनामुळे म्हैसाळ परिसरात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

