खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगलीच्या जत साखर कारखान्यावरून शरद पवार गटाचे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातलं संघर्ष आणखी वाढणार आहे. कारण जत शहरामध्ये साखर कारखाना परत द्या. अशा आशयाचे फलक जयंत पाटलांच्या नावाचे विडंबनात्मक फलक शहरात लावण्यात आले आहेत.
अज्ञातांकडून रातोरात भला मोठा डिजिटल फलक जत शहरातल्या चौकात लावण्यात आला आहे. यामध्ये जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का,असा मजकूर लिहित जयंत पाटील यांच्याबरोबर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांचे कार्टून देखील बनवण्यात आले आहेत. काल जत शहरातले गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक फाडण्याचा प्रकार घडला होता. यानंतर रातोरात जयंत पाटलांच्या विरोधातले डिजिटल फलक जत शहरांमध्ये लावण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नावावर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा डिजिटल फलक झळकण्यात आला होता. यानंतर पडळकर यांच्या माध्यमातून जत नगरपालिका इमारत, जत पंचायत समिति इमारत, उपप्रादेशिक कार्यालय नूतनीकरण विकास कामांना मंजूर झालेल्या निधी याबाबत भाजपच्यावतीने शहरात लावलेले डिजिटल पोस्टर आज्ञातानी शनिवारी रात्री फाडले. या कृत्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी विजयपूर-गुहागर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून जतमध्ये कॉँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. शाब्दिक वाॅर वरुन आता हा वाॅर डिजिटल स्वरूपात पाहायला मिळतोय.
आज जयंत पाटील पुन्हा जत दौऱ्यावर असून गुप्त बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. तर येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी ही चाचणी सुरू आहे. जयंत पाटील नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत.? हे अद्याप तरी स्पष्ट नसलं तरी मोठी खेळी होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

