खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
Teacher kills husband with banana shake : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना उघड झाली आहे. दारूड्या नवऱ्याला संपवण्यासाठी २३ वर्षीयी शिक्षिकेने मुलांचा व्हॉट्सॲप ग्रुप केला होता.नवऱ्याला बनाना मिल्क शेकमधून विष देऊन जीव घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने जंगलात फेकले. असा खुलासा चौसाळा जंगलातील अज्ञात मृतदेह प्रकरणी झाला आहे. यवतमाळ लगत असलेल्या चौसाळा जंगल परिसरातील किटाकापरा परिसरात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. या प्रकरणाच्या तपासात शर्टच्या तुकड्यावरून खूनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह तीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच मद्यपी पतीला बनाना शेकमधून वीष दिले, त्यानंतर तो ठार होताच शिकवणीस येणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत शहरालगतच्या चौसाळा येथील जंगलात मृतदेह फेकला. शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जात पेट्रोल ओतून पेटवून दिले. ही बाब पुढे येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने आरोपी शिक्षिकेला अटक करीत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. शंतनू अरविंद देशमुख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निधी शंतनू देशमुख असे मारेकरी पत्नीचे नाव आहे. ते दोघेही यवतमाळच्या सुयोगनगरात वास्तव्याला होते. निधी ही एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका तर शंतनू हा तिथे शिक्षक होता. वर्षाभरापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर शंतनूला दारूचे व्यसन जडले. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईलमधील तिचे असशील छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा, मारहाणही करायचा. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढण्याचे ठरविले.
१३ मे च्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहिला. त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून खरेदी केले. त्यानंतर रात्री पती शंतनू दारूच्या नशेत घरी येताच त्याला बनाना शेकमध्ये विष मिसळून दिले. ते पिताच शंतनू हा काही क्षणातच जागीच ठार झाला. त्यानंतर तिने ही बाब शिकवणीला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सांगितली. त्यांना भावनिक करीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सांगितले. दोन विधी संघर्ष विद्यार्थ्यांनी दुचाकीने शंतनूचा मृतदेह चौसाळा येथील जंगलात नेऊन फेकून दिला. त्यानंतर तिने पोलिसांच्या भीतीने दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह चौसाळा जंगल गाठून मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
चौसाळा परिसरात मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला, मात्र मृतकाची ओळख पटत नव्हती. शंतनुची मिसिंगही पोलिसात दाखल नव्हती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी गोपनीय माहिती गोळा केली. त्यामध्ये ज्या मित्रांबरोबर खुनाच्या आदल्या दिवशी तो दारू प्यायला होता. त्यांच्याकडे त्या दिवशीचा त्याचा व्हिडिओ होता. शिवाय घटनास्थळावर त्याच्या शर्टच्या कपड्याचे तुकडे आणि व्हिडिओतील शर्ट एकाच असल्याने तो शंतनूचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी निधीसह तिच्या भावाला ताब्यात घेत दोघांची कसून चौकाशी केली. तेव्हा भाऊ यात गोवला जाईल या भीतीने तिने गुन्ह्याची कबुली दिली.