दहिवडी / विधायक कार्यातून जनतेच्या समस्या सोडवा, पर्यावरण, जलसंवर्धन, रक्तदान शिबिरे अशा जनोपक्रमातून आपले नेतृत्व विकसित करा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले.
येथील दहिवडी कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी प्राचार्य डॉ.एस.टी. साळूंखे यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्यमंत्री ना. पवार यांची मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके, रयतचे ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विभाग प्रमुख प्रा. भक्ती पाटील, प्रा. दत्तात्रय मांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना. पवार म्हणाले, नेतृत्व विकासासाठी महान राजकीय नेत्यांची चरित्रे वाचली पाहिजेत, व्यापक जनसंघटन, संयम, वक्तशीरपणा, नम्रता इ. गुण आत्मसात केल्यास सामाजिक बांधिलकीतुन सतत कार्यरत राहून लोकप्रियता प्राप्त होते. या लोकप्रियतेतून राजकीय नेतृत्व उदयास येते व स्व. ना. आर. आर. पाटील यांच्यासारखे जि.प. सदस्य ते उप मुख्यमंत्री पदापर्यंतचे यश मिळविता येते.
या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ना. पवार यांनी आपले अविरत कार्य करण्याचे रहस्य, आपले छंद, स्वतःचा प्रगत असा शेती व्यवसाय, शेती व्यवसाय पुरक कुक्कटपालन, ऊस शेती, दुग्ध उत्पादन याबाबत माहिती दिली. कोरोना काळातील सरकारची कार्यपद्धती, प्राधान्यक्रम, टास्क फोर्स मार्गदर्शन व लोक प्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्यावर भाष्य केले. विधानमंडळातील गदारोळाच्या प्रसंगांबाबत मत व्यक्त करताना विधीमंडळ कामकाज प्रक्रिया व सदस्यांचे अधिकार यावर भाष्य केले. सुदैवाने महाराष्ट्राला चांगली राजकीय परंपरा असल्याचं अधोरेखित करताना सभागृहात गदारोळ करणं हे लोकशाहीस घातक असल्याचं ही त्यांनी सांगितल. या प्रसंगी प्रा. दत्तात्रय मांजरे यांनी ना. पवार यांना “शरदचंद्र पवार यांचे आधुनिक भारताच्या विकासात योगदान ” हा शोध निबंध भेट दिला. मुलाखतीचे प्रास्ताविक व उपस्थितांचा परिचय प्रा. भक्ती पाटील यांनी करून दिला.
मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून वर्षा सत्रे, वैष्णवी खरात, अनुराधा काटकर, किशोर खरात, हर्षद वावरे, पूनम सरगर या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी ना. पवार यांना प्रश्न विचारले.

