खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
मिरज येथील शासकीय रुग्णालयातून चोरीला गेलेल्या नवजात बाळाला ५६ तासांत शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले. बाळ चोरणारी महिला व नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळज येथून ताब्यात घेण्यात आले.
दोन दिवस दूध पावडर पाजल्यानंतरही बाळाची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. बाळ पुन्हा कुशीत विसावल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांनी पुन्हा घडविली. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवारी दुपारी तीन दिवसांचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती. कोळे (ता. सांगोला) येथील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल होती. अज्ञात महिलेने नवजात अर्भकाला पळवून नेल्याने मातेसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पोलिसांनी विविध ठिकाणी तपास पथके पाठवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व सावळज गावातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सावळज येथील सारा साहेबा साठे (वय २४) या महिलेस बाळासह ताब्यात घेतले. अपहरणप्रकरणी महिलेविरुद्ध गांधी चौक पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. दोन दिवस गाजत असलेल्या या प्रकरणातील अपहृत बाळ सुखरूप सापडल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातील सायंकाळ आज भावनेने ओथंबलेली होती. तीन दिवसांपासून येथे ‘त्या’ बाळाच्या चोरीने सारेच हादरून गेलेले. सारेच सुन्न झालेले. आजी-आजोबा, वडील, आई साऱ्यांचे सांत्वन करताना अपरिचितही भावनिक होत होते. ‘त्या बाळाचं काय झालं असेल,’ हीच चिंता प्रत्येकाच्या मनात दाटली होती. आपला रुग्ण येथे दाखल असल्याचे पाहायला आलेला पाहुणादेखील या आजी-आजोबांकडे विचारपूस करत होता. सायंकाळी साडेसात-आठच्या सुमारास बाळ सापडल्याची व ते जिवंत असल्याचे बातमी थडकली.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. दोन दिवसांपासून प्रचंड तणावाचा सामना करणाऱ्या येथील यंत्रणेचा जीवही त्यामुळे भांड्यात पडला. आजोबा गोरड ‘सिव्हिल’च्या दारात उभे होते. जो-तो येऊन त्यांच्या हातात हात देऊन अभिनंदन करत होता. काही लोक त्यांना मिठी मारत होते. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. लेकरू सुखरूप असल्याचं कळल्यापासून आजोबा आनंदाने बागडत होते.