खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीकक्षातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी करणार्या महिलेला न्यायालयाने पुढील तपास करण्यासाठी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले.

शनिवारी सावळज येथील विवाहित तरूणी सारा सायबा साठे या संशयित महिलेने रूग्णालयातून बाळाला डोस देउन आणते असे सांगत तीन दिवसाच्या बाळाची चोरी केली होती.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात प्रसुती झालेल्या कविता अलदार या महिलेचे तीन दिवसाचे बाळ चोरीस गेल्याची घटना शनिवारी घडली. यानंतर मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाळ चोरून नेत असताना संशयित महिला रूग्णालयाच्या चलचित्रीकरणामध्ये कैद झाली होती.
या छायाचित्राच्या माध्यमातून पोलीसांनी समाज माध्यम, जिल्ह्यासह कोल्हापूर व कर्नाटकातील बेळगाव व विजयपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता. काल अज्ञाताने दूरध्वनीवरून संशयास्पद महिला सावळज (ता. तासगाव) येथे वास्तव्यास असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलीसांच्या पथकाने सावळज येथून संशयित महिलेसह नवजात अर्भकाला ताब्यात घेण्यात आले.
संशयित सारा सायबा साठे (वय २४) ही मूळची इचलकरंजी येथील रहिवासी असून ती व पती सायबा साठे हे दोघे सावळज येथे वास्तव्यास आहेत. दोघांचा प्रेमविवाह असून काही महिन्यापुर्वीच संशयित महिलेचा गर्भपात झाला होता. त्यावेळी उपचारासाठी मिरजेतील रूग्णालयात दाखल होती. यामुळे रूग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची तिला माहिती होती. मातृत्व हरवलेल्या तरूणीने अर्भक चोरीचे कृत्य केले. शनिवारपासून सलग ५० तासाहून अधिक काळ अर्भक तिच्या ताब्यात होते. मातेच्या दुधापासून वंचित असलेल्या बाळासाठी तिने दुधभुकटीचा वापर केला. पोलीसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अप्पर अधिक्षक रितू खोकर यांनी बाळाला आईच्या ताब्यात दिले.
कोणताही ठोस पुरावा अथवा माहिती उपलब्ध नसताना अर्भकाचा शोध घेण्याची कामगिरी उप अधिक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक निरीक्षक सुनील गिड्डे, फौजदार रूपाली गायकवाड, धनंजय चव्हाण, वसंत किर्वे, अभिजित धनगर, अभिजीत पाटील, सूरज पाटील, रंजना बेडगे, साक्षी पतंगेे, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, विनोद चव्हाण यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. ठाणा प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी रजेवर असतानाही दूरध्वनीवरून तपास पथकाला मौलिक सूचना दिल्या.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे तपासाधिकारी फौजदार श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.