
- खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
धर्म विचारून एका ३५ वर्षीय तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची संतापजनक घटना विक्रोळी पार्कसाईड येथे उघडकीस आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या तृतीयपंथीयावर राजावाडी रुग्णालयात उपचारात सुरू आहे.

याप्रकरणी पार्कासाईड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध तृतीयपंथी व्यक्ती अधिनियन कायदा-२०१९ कलम १८(डी) भारतीय न्याय संहिता ११८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

कृष्णा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या सहकाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. पीडित तृतीयपंथी विक्रोळी पश्चिम येथे वास्तव्यास आहे. सोमवारी मध्यरात्री पीडित तृतीयपंथी डोकेदुखीचे औषध घेण्यासाठी मेडिकल दुकानात सहकाऱ्यासोबत जात असताना अमृत नगर रोड, मस्जिद गल्ली या ठिकाणी दोन इसम मद्यप्राशन करित होते. त्यातील एकाने पीडित तृतीयपंथीयाच्या सहकारी असलेल्या तृतीयपंथीयाला जाणूनबुजून धक्का देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान पीडित तृतीयपंथीयाच्या सहकारीने घाबरून तेथून पळ काढला. सहकरीन तृतीयपंथीयाने पळ काढल्यानंतर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांनी पीडित तृतीयपंथीयाच्या मानेला पकडून मद्याची बॉटल त्याच्या तोंडात टाकून बळजबरीने मद्य पाजले. त्यानंतर पीडितेला एका वाहनांच्या आडोशाला नेले व कृष्णा नावाच्या व्यक्तीने पीडितेला जात विचारली आणि तिला पाठमोरे करून पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केला.
या सर्व घटनेनंतर पीडित तृतीयपंथीयाची शुद्ध हरपली. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्याच्या डाव्या दंडावर गंभीर जखम झाली होती. त्यातून रक्त वाहत होते, घाबरलेल्या तृतीयपंथीयाने बहिणीला आणि मैत्रिणीला फोन करून बोलावून घेतले. पीडिताला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पार्कसाईड पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदवून दोन जणांविरुद्ध तृतीयपंथी व्यक्ती अधिनियन कायदा-२०१९ कलम १८(डी) भारतीय न्याय संहिता ११८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कृष्णा नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.