खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
नेहमीच वादग्रस्त, शिक्षक व शिक्षकेतरावर अतिरिक्त दबाव, लैंगिक शोषणाचा आरोप अशी मलीन प्रतिमा असलेल्या मुख्याध्यापकास बेदम चोप मिळूनही, काहीच घडले नाही, अशा अविर्भावात असलेल्या संशयित मुख्याध्यापकाचे नाव विनोद परसू जगधने.या वादग्रस्त व्यक्तीचे अनेक कारनामे चव्हाट्यावर येत आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी संदीप कांबळे यांनी आरोपी जगधने यास गजाआड करून जिल्हा विशेष न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. अजूनही दोन विद्यार्थिनींचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे.
जत तालुक्यातील सनमडी येथील महात्मा जोतिराव फुले प्राथमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी उमदी पोलिसात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. या नराधमास कठोर शिक्षा करायची मागणी होत आहे.
या आश्रमशाळेस इयत्ता नववीच्या शिक्षण विभागाची मान्यता नसताना २० विद्यार्थिनी, १८ विद्यार्थी असे एकूण ३८ विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिला. विशेषत: याच संस्थेच्या एका शाखेत हा प्रवेश दाखवला. मात्र यात एका पीडित विद्यार्थिनीस प्रवेश दिला आहे. पीडित मुलीकरिता नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवली नसती, तर कदाचित लैंगिक अत्याचार झाला नसता.
तब्बल १९ जणांचे जबाब
बुधवारी संशयित नराधमास विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याच्या कारणावरून पालकांनी चोप दिला होता. तरीही संशयित मुख्याध्यापक जत शहरातून उघड, उजळमाथ्याने फिरत होता. यापूर्वी अशा प्रकारच्या तीन घटना दडपल्या होत्या. शुक्रवारी सकाळपासून बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे, निरीक्षक गायत्री फडणीस, बालकल्याण समितीच्या निरीक्षक माने, निर्भय पथकाच्या मनीषा नारायणकर यांच्या चौकशी समितीने आतापर्यंत चार विद्यार्थिनींचे, दोन पालकांचे, चार शिक्षकांचे, चार महिला शिक्षिकांचे, एका वसतिगृह अधीक्षकाचे, दोन महिला स्वयंपाकी, एक पुरुष कामाठी, एक महिला मदतनीस असे चौकशीत एकूण १९ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात मुख्याध्यापकाच्या विरोधात काही जबाब असल्याची चर्चा आहे.