
सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीमध्ये सराफाच्या झालेल्या जबरी चोरीचा २४ तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून यात तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम सांगली पोलिसांनी जप्त केली आहे.

परंतु, फिर्यादी यांनी फिर्याद देताना दिलेली रक्कम आणि प्रत्यक्षात जप्त केलेले रक्कम यामध्ये मोठी तपावत असल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. आता, सांगली पोलीस आणि आयकर विभागाकडून देखील याचा तपास केला जाणार आहे. सांगलीतील जत तालुक्यातील उमदी येथील सराफ व्यावसायिक अनिल अशोक कोडग हे कर्नाटकातील विजयपूरकडे निघाले असता त्यांना ७ संशयतांनी आडवी गाडी लावून त्यांना अडवले. त्यानंतर, रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करून लूटमार केली होती.
सराफ व्यापारी कोडग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी रोकड, मोबाईल आणि सोन्याची अंगठी असा ३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या जबरी चोरीची माहिती मिळताच सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक नियुक्ती केले होते. त्यांचे पथक उमदी येथे गस्त घालत असताना ७ जणांनी ही जबरी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमदीमधील रवी तुकाराम सनदी आणि कर्नाटकातील विजयपूर येथील अजय तुकाराम सनदी व चेतन लक्ष्मण पवार यांना उमदी ते विजयपूर रस्त्यावर अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानी अन्य ४ संशितांच्या मदतीने ही चोरी केली असल्याची कबुली दिली.
सराफाकडील ड्रायव्हरच्या लेकाने दिली माहिती
पोलीस पथकाने लालासाहेब हजरत होनवाड, आदिलशहा राज अहमद अत्तार, सुमित सिद्राम माने आणि साई सिद्धू जाधव यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशितांपैकी साई जाधव याचे वडील सिद्धू जाधव हे फिर्यादी अनिल कोडक यांच्या कारवर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहेत. फिर्यादी अनिल कोडग हे कोठे जाणार आहेत, याबाबत लाईव्ह लोकेशन साई जाधव हा अन्य सहा संशयितांना देत होता. त्यानुसार अनिल कोडक हे विजयपूरकडे जात असताना जत तालुक्यातील मोरबगी या गावाजवळ त्यांची कार अडवून लुटमार केली होती. परंतु, प्रत्यक्षात अनिल कोडक यांनी ३ लाख रुपयांची चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनी मात्र या प्रकरणात तब्बल अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
६ दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, फिर्यादीची रक्कम आणि पकडण्यात आले रक्कम यामध्ये फार मोठी तफावत असल्याने पोलिसांनी याबाबत आयकर विभागाला देखील कळविले आहे. सापडण्यात आलेल्या रकमेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सर्व संशयीतांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या संशयितांनी इतकी मोठी रक्कम कोठून आणली? फिर्यादी अनिल कोडग यांनी केवळ तीन लाखांची फिर्याद का दिली? तसेच यामध्ये अन्य कोणते संस्थेत सहभागी होते का? याचा देखील शोध आता सांगली पोलिसांना लावायचा आहे.