
- सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली येथील जिल्हा कारागृहातील स्वच्छतागृहात गांजा ओढणाऱ्या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बाबासाहेब चव्हाण (वय ३३ रा. कवठेपिरान), किरण लखन रणदिवे (वय २७ रा.कारंदवाडी), सम्मेद संजय सावळवाडे (वय २४, रा. आष्टा) अशी तीन न्यायालयीन बंदीची नावे आहेत. कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी फिर्याद दिली. जिल्हा कारागृहात गांजा सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित सचिन चव्हाण, किरण रणदिवे, सम्मेद सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते न्यायालयीन बंदी असून जिल्हा कारागृहात तिघांची ओळख झाली आहे. दि. २९ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बॅरेक क्रमांक तीनच्य बाथरूममध्ये तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलिमसारखे तयार करून ते ओढत होते. सुभेदार सूर्यकांत पाटील व हवालदार बबन पवार, शिपाई हणमंत पाटणकर हे बॅरेक क्रमांक ३ मध्ये राऊंड घेत फिरत होते. तेव्हा बाथरूममध्ये सचिन, किरण, सम्मेद हे तिघेजण गांजा ओढताना दिसून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलिम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले. अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. तत्काळ हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सुभेदार पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर एनडीपीएस ॲक्ट कलम २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

-
गांजा येतो कोठून..?
जिल्हा कारागृहात बाहेरून गांजा पुरवण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. राजवाडा परिसरातून रबरी चेंडू, रिकाम्या बाटलीतून गांजा फेकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे.