
- सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येतील तासगाव तालुक्यातील सावळज येथे सर्पदंश झालेल्या नवविवाहित महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.कावेरी चव्हाण असे विवाहित महिलेचे नाव आहे.

सर्पदंशानंतर वेळेत उपचार करण्यासाठी डॉक्टर उपस्थित नसल्याने कामात हलगर्जीपणचा ठपका ठेवत वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी मालेदार यांना बडतर्फ करण्यात आले असून, डॉ. आरती शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील सावळज येथे कावेरी चव्हाण या वास्तव्यास होत्या. त्या घरात झोपेत असताना त्यांना नागाने दंश केला होता. नागाने दंश केल्याचे निदर्शनास येताच कावेरी यांना उपचारासाठी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे नियुक्तीस असणार्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती शेळके आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी मालेदार या दोघीही उपस्थित नव्हत्या. त्यामुळे उपस्थित असणार्या एका परिचारीकेने कावेरी यांना एक इंजेक्शन दिले. पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत नातेवाईकांनी तक्रार केली होती. तसेच आमदार रोहित पाटील (MLA Rohit Patil) यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसणार्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी डॉ. नंदिनी मालेदार यांना सेवेतून बडतर्फ केले. तर डॉ. आरती शेळके यांचे निलंबन करण्यात आले.