
- कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
शहरातील ढालाईत चौकात कारला दुचाकी घासल्याच्या किरकोळ कारणावरून विकी जयपाल सावंत (वय 38, रा. कापसे प्लॉट, कुपवाड) या पोलिसाच्या डोक्यात ग्लास मारून जखमी केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तिघांना अटक केली.

कुमार किसन रूपनर (रा. इंदिरा कॉलनी, साठेनगर, सांगली), अनिस यासीन मुजावर (रा. चैतन्यनगर, संजयनगर, सांगली) व पवन राजू पडळकर (रा. पाटणे प्लॉट, संजयनगर सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पोलिस सावंत हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कारमधून ढालाईत चौकातून घरी जात होते. यावेळी एकाच दुचाकीवरून आलेले संशयित रूपनर, मुजावर व पडळकर तेथून जात होते. संशयितांची दुचाकी सावंत यांच्या कारला घासल्याने त्यांनी गाडी थांबवून त्या तिघांना, व्यवस्थित गाडी चालवा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिघांनी रागाने चिडून पोलिसाला शिवीगाळ करीत कारमधून बाहेर रस्त्यावर ओढून बेदम मारहाण केली. या घटनेत तिघांपैकी एकाने रस्त्याकडेच्या आईस्क्रिमच्या गाड्यावरील काचेचा ग्लास हातात घेऊन पोलिसाच्या डोक्यात घातला. पोलिसाच्या डोक्यात रक्तस्त्राव होऊन गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी धाव घेऊन जखमी सावंत यांना रुग्णालयात दाखल केले. जखमी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित तिघांना कुपवाड पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हवालदार प्रदीप भोसले तपास करीत आहेत.