सांगली प्रतिनिधी | महापालिकेचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प 1 हजार कोटींवर जाणार आहे. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा 177 कोटीने अर्थसंकल्पात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शासकीय निधीचा समावेश आहे.
घरपट्टीचा महसूलही वाढणार आहे. आयुक्त शुभम गुप्ता हे पुढील आठवड्यात प्रशासकीय महासभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.
महापालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प 823 कोटी रुपयांचा होता. यंदा या अर्थसंकल्पात जवळपास 177 कोटींची वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प 1 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. महापालिकेचे स्वीय निधीचे उत्पन्न कमी आहे. ते वाढवणे आवश्यक होते. त्यानुसार आयुक्त शुभम गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. मालमत्ता सर्वेक्षणातून 56 हजारावर अनोंदीत मालमत्ता समोर आल्या आहेत. त्यातून सुमारे 25 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढणार आहे. बाजार परवान्यासाठी आयुक्त गुप्ता हे आग्रही आहेत. त्यानुसार बाजार परवाना शुल्काच्या रूपानेही चांगला महसूल जमा होईल, असे अपेक्षित आहे. वाढीव अंदाजपत्रकाच्या जमेच्या बाजूला शासकीय निधीचा प्रामुख्याने मोठा वाटा असणार आहे. शासन अनुदानीत विविध योजनांना निधी मिळणार आहे. शेरीनाला योजना, प्रधानमंत्री ई-बस योजना व अन्य योजनांसाठी शासननिधी अपेक्षित आहे.

