मिरज (प्रतिनिधी) तालुक्यातील बेडग येथील एका आश्रम शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने मिरज तालुक्यात खळबळ उडाली आहे. कावीळची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज तालुक्यातील बेडग येथे असलेल्या एका आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गामध्ये सुमारे ४८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी काही विद्यार्थ्यांना दिनांक १४ फेब्रुवारी रोजी कावीळ सदृश्य उलटी, जुलाब, ताप येणे अशी लक्षणे दिसू लागली. दिनांक २७ फेब्रुवारी रोजी येथील काही विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली असता येथील विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याचे समोर आले.

येथील एकूण १८ विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे व अन्य विद्यार्थी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर शाळेतील ४ विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली. दूषित पाणीपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात शाळेतील विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे.
