जिल्ह्यामधील ड्रग्जची पाळेमुळे खणून काढून त्याचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. ठाण मांडून बसलेल्या निष्क्रिय अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
ड्रग्जप्रकरणी कडक धोरण राबविणार असून, यासाठी कोणाचेही दडपण घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्ह्यात सध्या ड्रग्ज, नशिल्या पदार्थांच्या तस्करीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येतील. पोलिस, अन्न व औषध प्रशासन, औद्योगिक अधिकारी, प्रशासकीय अधिकार्यांचे टास्क फोर्स करण्यात येईल. हे टास्क फोर्स एकमेकांशी समन्वय ठेवून ड्रग्जच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्यास आम्ही स्वागत करणार आहे. तपास, प्रबोधन, जनजागृती आणि बक्षिसे या पध्दतीने ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्यात येतील.
ड्रग्जच्या तस्करीकडे दुर्लक्ष करणे त्याचबरोबर वर्षानुवर्षे जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या निष्क्रिय पोलिस अधिकार्यांची बदली करण्यात येईल. त्याचबरोबर ड्रग्ज तपासासाठी चांगले काम करणार्या अधिकार्यांची मदत घेण्यात येईल.ड्रग्जसंदर्भात माहिती देणार्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्यांचा वैयक्तिरित्या सत्कार करून बक्षीस देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या तपासासाठी मदत केलेल्या चौघांना 40 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. ड्रग्जसंदर्भात कडक धोरणाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणाचेही दडपण घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कारखान्यांचीही तपासणी करणार
औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची तपासणी करण्यात येणार आहे. कशासाठी परवाना घेतला आणि तेथे काय उत्पादन होते याची तपासणी करण्यात येणार आहे. बंद पडलेल्या कारखान्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकार्यांनाही सूचना करण्यात आलेल्या आहेत.

