संतोष आठवले यांचा आरोप : आज तक्रार करणार
तासगाव : खबऱ्या प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील अनेक गावात शासनाच्या योजनेतून हायमास्ट बसवण्यात आले आहेत. यातील एकाही हायमास्टला वीज पुरवठा करताना अतिरिक्त वीज वापराची परवानगी ग्रामपंचायतीने घेतलेली नाही. मात्र गावातील वार्डात निवडून यायची ज्याची लायकी नाही त्याच्या तक्रारीवरून कवठेएकंद येथे वीज महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीला नोटीस काढली आहे. जर केवळ तांत्रिक अडचणी निर्माण करून कवठेएकंद येथेच वीज महावितरण कंपनी कायद्याचा धाक दाखवत असेल तर तालुक्यातील गावागावात हायमास्टला विनापरवाना वीज वापरण्यात येत असलेल्या प्रकाराबाबत आज मी स्वतः तक्रार करणार आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी दिली.
आठवले म्हणाले, कवठेएकंद येथे दलित वस्तीतच हायमास्ट बसविण्यात आले आहेत. ज्याठिकाणी आता हायमास्ट आहेत त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील अनेक लोक रहायला आहेत. मात्र गावात चांगले काम होत असल्याने अनेकांच्या पोटात कळा यायला लागल्या आहेत. त्यामुळे सूडबुद्धीने ग्रामपंचायत विरोधात काही लोक तक्रारी करत आहेत. या लोकांची वार्डात निवडून याची लायकी नाही. मात्र केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून या तक्रारी केल्या जात आहेत. तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवून ग्रामपंचायत व गावाला बदनाम करण्याचे कारस्थान केले जात आहे. असे करणाऱ्याचे पितळ लवकरच उघडे पडेल.
आठवले पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षातील सत्ताधार्यांनी गावात अनेक ठिकाणी एलईडी बल्ब बसवले होते. या वाढीव बल्बसाठी लागणारी अतिरिक्त वीज विनापरवाना वापरण्यात येत आहे. कवठेएकंद वीज महावितरण कंपनीचा उपअभियंता मागील पाच वर्षात झोपला होता काय. त्यावेळी एलईडी बल्बसाठी वापरण्यात आलेला अतिरिक्त वीजपुरवठा त्याला दिसला नाही का. या अभियंत्याने तोंड बघून काम करायचे बंद करावे. अन्यथा गावकरी त्याला त्याची जागा दाखवून देतील, असा गर्भित इशाराही यावेळी आठवले यांनी दिला.
दरम्यान तालुक्यातील गावागावात हायमास्ट व एलईडी बल्बसाठी अतिरिक्त वीज वापरण्यात येत आहे. एकाही ग्रामपंचायतीने या अतिरिक्त वीज वापराची परवानगी वीज महावितरण कंपनीकडून घेतली नाही. या सर्व गावांकडे एम. एस. ई. बी ने दुर्लक्ष केले आहे. मात्र कवठेएकंद येथे एखाद्या तक्रारीवरून लगेच ग्रामपंचायतीला कायद्यात पकडले जाते. जर कवठेएकंद ग्रामपंचायतीला नोटीस पाठवली जात असेल तर तालुक्यातील ज्या – ज्या गावात बल्ब व हायमास्टसाठी अतिरिक्त वीज वापर झाला आहे त्या ठिकाणीही वीज महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून कारवाई करावी. याबाबतची तक्रार आज मी स्वतः गट विकास अधिकारी व वीज महावितरणकडे करणार आहे, अशीही माहिती आठवले यांनी दिली.