दोन भावांमध्ये भांडणे झाली. दोघांनी एकमेकाविरोधात केस केली. पण या प्रकरणात अटक होण्यापासून शिल्लक राहिलेल्या महिलेला अटक न करण्यासाठी हवालदाराने लाच मागितली.
गेल्या अनेक महिन्यांपासून अशा स्वरूपाची लाच घेतल्याशिवाय हा हवालदार कामच करत नाही. अखेर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि हवालदार आठ हजारांची लाच घेताना बरोबर सापळ्यात अडकला.
पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात याला आठ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले. तक्रारदाराच्या पत्नीला अटक न करण्यासाठी हवालदाराने लाच मागितली. यातील थोडक्यात माहिती अशी, दोघा भावांमध्ये भांडणे झाली. दोघांनी पोलिसात तक्रार दिली. दोघांपैकी काही जणांना अटक झाली. जामीन झाले, पण तक्रारदाराच्या बायकोला अटक करण्याचा हवालदाराने तगादा लावला.
तिला अटक न करण्यासाठी हवालदाराने तक्रारदाराकडे लाच मागितली. या लाचेच्या बदल्यात चार्जशीट पाठवताना देखील मदत करू असे हवालदाराने आश्वासन दिले. मात्र या हवालदाराचा यापूर्वीचा अनुभव माहीत असल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली आणि हवालदाराने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार, गणेश पिंगूवाले, साहेबन्ना कोळी, संतोष नरूटे, गजानन किणगी, राहुल गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला आणि थोरात लाच घेताना बरोबर अडकला.