गोपनीय खबऱ्या – विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्रातील एका दाम्पत्याने दोन वर्षांच्या बालिकेची 4 लाख 50 हजार रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 8) उघडकीस आला. जिल्हा बालसंरक्षण सहाय्य केंद्राने हा प्रकार उघडकीस आणला.
याप्रकरणी केंद्राचे अधिकारी मल्लेश कुंदरगी यांच्या फिर्यादीवरून मार्केट पोलिस ठाण्यात मुलीच्या पालकांसह तिला खरेदी करणारी महिला व मध्यस्थ मिळून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र मेत्री व शिल्पा मेत्री (रा. कुची रोड, तेलीवस्ती, कवठेमहांकाळ, जि. सांगली) अशी पालकांची नावे असून स्मिता ज्ञानेश्वर वाडीकर (रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार, सध्या रा. गोवा) असे खरेदीदार महिलेचे नाव आहे. तर वंदना परशराम सुर्वे (रा. वडगाव, बेळगाव), रवी राऊत व राणी राऊत (दोघेही रा. सोलापूर) यांनी मध्यस्थी केली आहे. सदर बालिकेची विक्री 27 फेब्रुवारी 2024 रोजी रामनगरमधील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बालिका विक्री करण्याचा प्रकार 17 डिसेंबर 2024 रोजी उघडकीस आला. बेळगाव बालकल्याण समितीला एक निनावी फोन आला. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका बालिकेची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बालकल्याण समितीच्या अधिकार्यांनी स्मिता वाडीकर हिच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. वाडीकरला जिल्हा बालसंरक्षण साहाय्य केंद्रात बोलावून सखोल चौकशी केली असता तिने घडलेली संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर केंद्राच्या अधिकार्यांनी मार्केट पोलिस ठाण्यात धाव घेऊन या सर्वांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम 143, 370 सहकलम 149 भादंवि 80, 81 बालसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.